Saturday 10 May 2014

Indian Politics and Narendra Modi : मोदीच सत्तेवर येतील ........ पण कसे ?


झालं. आज प्रचाराच्या शेवटच्या तोफा थंडावतील. दोन दिवस धुरळा खाली बसल्यासारखा वाटेल. बारा तारखेचं मतदान पार पडलं कि झालं. मिडिया सरसावून बसलेलं आहेच. त्यांनी आजच जाहीर करून टाकलंय कि बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून एक्झिट पोलचे निकाल पाहण्याच्या तयारीत राहा. सोळा तारखेला मतमोजणी आणि ...........

सकाळी झोपेतून उठल्यानंतर उमेद्वारांपासून मतदारांपर्यंत प्रत्येकाच्या काळजाचे क्षणाक्षणाला वाढत जाणारे ठोके. विजयानंतर होणारा जल्लोष आणि पराभवानंतर येणारी निराशा.

पराभवाची आणि विजयाची ........... निराशेची आणि जल्लोषाची. उमेदवारांना या सगळ्याची सवय असते. पण मतदार  ......... ?????  मतदार मात्र निवडणुकीतल्या या हुरहुरीला पहिल्यांदाच सामोरा जातोय. गेली साठ वर्षे तो केवळ वारं फिरेल तसा फिरत राहिला.………. मतदान करायचंय म्हणून मतदान करत राहिला………सत्तेत येणारं सरकार स्विकारत राहिला. पण यावेळी पहिल्यांदाच त्यानं काही निश्चयानं मतदान केलंय. त्याला सत्ताधाऱ्यांची सत्ता उलथून टाकायचीय. मोदींना सत्तेत आणायचय. आणि आपल्या मताला………. आपल्या प्रार्थनेला यश येतंय कि नाही याची धाकधूक त्याच्या मनात आहे आणि म्हणूनच यावेळी पहिल्यांदाच मतमोजणी सुरु होईल तेव्हा आमचा मतदार वनडेचा किंवा टि ट्वेन्तीचा थरार पहात असल्यासारखा काळीज तळहातावर घेऊन बसेल.

राहुल गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते छातीठोकपणे यूपीएच सत्तेत येणार असे सांगत असले तरी किंवा एनसीपीचे शरद पवार ……सपाचे मुलायमसिंग ………. बसपाच्या मायावती …………. जदयुचे लालू…………. तृणमूलच्या ममता या संधिसाधू प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकार सत्तेत येणार नाही अशी दाहीदिशांनी बोंब ठोकली तरी आणि मोदींच्या विरोधातल्या राजकीय विश्लेषकांनी कितीही नाही म्हणले तरी भाजपला आणि पर्यायानं मोदींना सत्तेत येण्यापासून आता कोणीच रोखू शकणार नाही. मोदींच्या विरीधातील सगळ्यांचीच अवस्था दारू पिऊन झोकांडे खात चालणाऱ्या आणि , '' छे ,छे ! मला कुठं काय झालंय ? मी सरळच चाललोय कि. " असं म्हणणाऱ्या दारूड्यासारखी झालीय. वस्तुस्थिती स्विकारण्याची त्यांची तयारी नाही. आपले पाय लटपट कापताहेत हे ते मान्य करायला तयार नाहीत.

पण कोंबडं झाकुन ठेवलं म्हणून सुर्य उगवायचा रहातो का ? तसंच आता कुणी कितीही नाही म्हणलं तरी भाजपाचं सरकार पूर्ण बहुमतानं सत्तेत आल्यावाचून रहाणार नाही. मोदींपासून मुख्तार अन्सारींपर्यंत भाजपाचे अनेक नेते एनडिए पूर्ण बहुमतानं सत्तेत येईल असं म्हणतात. पण त्यांच्या त्या विधानातही काहीवेळा आत्मविश्वासाचा आभाव दिसतो. पण जेव्हा खरोखच त्यांचं सरकार बहुमतानं सत्तेत येईल तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नसेल. पण हा आंनद जिंकण्याचा नसेल तर आता आपल्याला निर्विघ्नपणे सरकार चालवता येईल याचा असेल.

माझ्या या सगळ्या म्हणण्याला आधार काय ? -

१ ) मी गावोगावी , रेल्वेने , बसमधून फिरताना ऐकलेल्या चर्चा. या चर्चा मिडीयाच्या कॅमेऱ्यासमोर झालेल्या नव्हत्या.

२ )  मतदानात १० ते १२ % झालेली वाढ. यातली सगळी नाही तरी ८ % वाढ भाजपाच्या वाटयाला जाणार. आणि मतांमधली ८%वाढ म्हणजे जागांमधली २५ % वाढ.

३ ) १८ ते २२ या वयोगटातील पहिल्यांदाच मतदान करणारा एकूण मतदार संख्येच्या १२ % असणारा तरुण मतदार. हा तरुण मतदार बहुसंख्येनं भाजपाच्या पाठीशी उभा रहाणार. त्यामुळेच भाजपाच्या जागा आणखी २५ % वाढतील.

४ ) मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपाच्या जागांमध्ये १० % वाढ होणार आहे.

५ ) यावेळचा मतदार मतदान करतोय ते बदलासाठी. मतदाराच्या या भुमिकेमुळे भाजपाच्या जागांमध्ये होणारी वाढ निश्चित सांगता येणार नाही. पण ती भाजपाला बहुमतानं सत्तेत आणण्यास पुरेशी ठरणार आहे.

६) भाजपा असो वा अन्य कुणी सगळ्यांची राजकीय गणितं अवलंबून असतात ती युपी - बिहार मधील यशावर. इथं आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही असं भाजपा नेत्यांना वाटतंय. पण तसं होणार नाही. भले बिहारमध्ये भाजपाला थोडं कमी यश मिळेल पण युपीमध्ये मात्र सपा आणि बसपाच्या आशा धुळीस मिळणार आहेत आणि युपीच भाजपाला सत्तेवर विराजमान करणार आहे. इथं भाजपाला ५० हून अधिक जागा मिळतील.

माझा अंदाज चुकणार नाही. आणि त्यामुळेच मला त्याचं पुनर्मुल्यमापन करण्याची गरज पडणार नाही.  

No comments:

Post a Comment