Wednesday 21 May 2014

Indian Politics : उद्धवा जमिनीवर ये

दहा मेला शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडण्यापूर्वीच मी ' मोदीच बहुमताने सत्तेवर येतील ' असं भाष्य माझ्या ' मोदीच सत्तेवर येतील ........ पण कसे ?'   या लेखातून केलं होतं.

मी कोणी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही. पण भोवतालच्या परिस्थितीचं बारकाईन निरीक्षण निश्चित करतो. त्यामुळेच मोदीच सत्तेवर येतील हा माझा अंदाज बराचसा बरोबर ठरला.

कुठं आहे मोदींची लाट ? असं म्हणत वाळूत मान खुपसणारे सारेच शहामृग
वाळूतून मान बाहेर काढून आत्ता कुठे ' मोदींची लाट ' होती हे मान्य करू लागेत. पण विजयाच्या उन्मादात उद्धव ठाकरेंना मात्रं या गोष्टीचा विसर पडलेला दिसतोय आणि म्हणूनच त्यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत आणि मुख्यमंत्री पदाबाबत विधानं करायला सुरवात केली आहे. पण भुजबळांचा पराभव करण्याची ताकद हेमंत गोडसेंमध्ये नव्हती आणि निलेश राणेंना पाणी पाजणं विनायक राउतांना शक्य नव्हतं. पण त्यांनी भुजबळांचा आणि निलेश राणेंचा नुसताच पराभव नाही केला तर दिड लाखापेक्षा अधिक मतदान घेत त्यांना आस्मान दाखवलं.


आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादी सोडून शेकापची उमेदवारी घेतात आणि समोर राष्ट्रवादीचा उमेदवार असतानाही साडेतीनलाखाहून अधिक मते घेतात. उद्धव ठाकरेंनी विद्यामान खासदार गजानन बाबरांना खासदारकीचं तिकीट नाकारलं आणि ते श्रीरंग बारणेंसारख्या नवख्या उमेदवाराच्या झोळीत टाकलं. श्रीरंग बारणें काही या भागातले आमदार नव्हते. उलट एकदा आमदारकीला पराभूत झाले होते. आणि सध्या पिंपरी चिंचवडचे नगरसेवक आणि विरोधीपक्ष नेते होते.  पण तरीही श्रीरंग बारणेंसारखा शिवसेनेचा ढिसाळ उमेदवार निवडून येतो.

निवडणूकीपूर्वीचे शिर्डी मतदार संघातले शिवसेनेचे विद्यामान खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसमध्ये जातात. शिवसेनेची निम्मी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मतं मिळून आपण विजयी होऊ असं गणित मांडतात आणि तरीही दोन लाखांच्या मतांनी पराभूत होतात. हे सारं कर्तृत्व शिवसेनेच्या वाघांचं किंवा स्वतः उद्धव ठाकरेंचं नसून मोदींच आहे. आणि हे उद्धव ठाकरे लक्षात घ्यायला तयार नाहीत. 

हेच काय महाराष्ट्रातले बहुतेक निकाल भल्या भल्या राजकीय धुरिणांना अचंबित करायला लावणारा होते. महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांना तीसपेक्षा अधिक जागा मिळतील असं कुणालाच वाटत नव्हतं. पण तीसपस्तीस नव्हे तर भाजपा आणि मित्रपक्षांनी चक्क बेचाळीस जागा जिंकल्या. आणि याचं सारं श्रेय केवळ मोदींनाच दयायला हवं. 

हे सगळं उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला हवं आणि अधिक जागाच काय वेळ पडलीच तर मुख्यमंत्रीपदही भाजपाला द्यायला हवं. पण महाराष्ट्रात मीच मोठा असा सूर उद्धव ठाकरे लावत बसले आणि आघाडीत बिघाड आणला तर शरद पवार टपून बसलेले आहेतच. ते उद्धव ठाकरेंच्या या अस्मितेला खतपाणीच घालतील. आणि त्यातून काही चुकीचं घडलं तर उद्धवरावांची अवस्था ' आ बैल मुझे मार ' अशी होईल.

पण अशी अवस्था फक्त उद्धव ठाकरेंचीच होईल. भाजपाची नव्हे. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजपानं युपीमध्ये केवढं घवघवीत यश मिळवलंय ते सगळ्यांनी पाहिलंय. युपीमध्ये भाजपानं केवळ यशच नाही मिळवलं तर काँग्रेससारख्या एका राष्ट्रीय आणि शिवसेनेपेक्ष्या कितीतरी मोठया असलेल्या बसपासारख्या एका स्थानिक पक्षाचं नाव युपीच्या नकाशावरून पुसुन टाकलं. 

माझ्या बरोबर मी भाजपलाही खाली ओढेल अशा भ्रमात उद्धव ठाकरे असतील तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची आणि जिंकून येण्याची ताकद आजतरी  भाजपामध्ये निश्चित आहे. आणि वेळ आलीच ते तो मार्ग पत्करतील. कारण कोणतेही राष्ट्रीय पक्ष हे स्थानिक पक्षांना मोठे करण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. आणि हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला हवं. 
   

No comments:

Post a Comment