Sunday 29 June 2014

Love and Women : पुरुष स्त्रीचा दास का ?

खरंतर या जगात कुणीच कुणाचं दास नसतं. तरीही आपल्याला हव्या असलेल्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आपण आपल्या अनेक इच्छा आकांक्षांना मुरड घालतो. आणि यालाही समाजात ' दास होणं ' असंच संबोधलं जातं. या अर्थानं स्त्रीला पुरुषाची दास मानलं जातं. पण खरंतर बऱ्याचदा पुरुषच स्त्रीचा दास असतो. पुरुष स्त्रीचा दास कशामुळे झाला त्याची ही कथा -
परमेश्वरानं पृथ्वी निर्माण केली. अनेक प्राणी आणि वनस्पती निर्माण केल्या. पृथ्वीवर अनेक सजीव इकडून तिकडे धावू लागले. चिमण्यांचा चिवचिवट ऐकू येवू लागला. कोकिळेच्या सुरेल स्वरांनी आसमंत मंत्रमुग्ध झाला. सगळ्या प्राणीमात्रांवर सिंहाच साम्राज्य सुरु झालं. पण तरीही आपल्या निर्मितीत काही तरी कमी आहे असं परमेश्वराला जाणवलं.

तो पुन्हा विचार करू लागला. आणखी काहीतरी घडवायला हवं. असं काहीतरी ज्यामुळे या पृथ्वीच नंदनवन होईल. पण असं कोणता सजीव निर्माण करावा हे काही परमेश्वराला कळेना. चिंतेत गढलेला देव स्वतःच्या नकळत स्वर्गातल्या तळ्याकाठी गेला. आकाश निरभ्र होतं. तळ्याकाठच्या एका पाषाणावर परमेश्वर विसावला. विचारात गढून गेला.

तळ्यातल्या पाण्यात पडलेल्या स्वतःच्याच प्रतिबिंबावर त्याचं लक्ष गेलं. त्याचा निर्णय झाला. त्यानं हुबेहूब त्याचीच प्रतिकृती निर्माण करायचं ठरवलं. तो पुन्हा आपल्या महालात परत आला. सजीवांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मातीचा गोळा त्यानं हाती घेतला………

आधी पुरुषाला आकार दिला. मग स्त्रीलाही घडवलं. दोघांमध्ये प्राण ओतला. दोघांनी परमेश्वराला नमस्कार केला. आपल्या निर्मितीन परमेश्वर समाधान पावला. दोघांनाही खूप काही दिलं होतं परमेश्वरानं. पण लिंगभेद सोडला तर तसे दोघेही दिसायला सारखेच. पुरुषासारखीच स्त्री राकट , दाढी मिशा असलेली, शरीरावर कुठंही गोलाकार उंचवटे नसलेली. परमेश्वरालाच काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. यातला एक दुसऱ्यावर अधिराज्य गाजवेल असं या दोघांना अजून काहीतरी द्यायला हवं असं परमेश्वराला मनोमन वाटत होतं. पण काय ते मात्र कळेना.

विचार करता करता परमेश्वरानं त्याच्या जवळच्या पोतडीत डोकावलं. आणि हर्षभरान त्याचे डोळे चमकले. बुद्धी आणि सौंदर्य.

त्यानं दोघांना सुखानं नांदण्याचा आशीर्वाद दिला. आणि म्हणाला, ” मी खूप प्राणी घडवले. पण कुणीच मला नमस्कार केला नाही. तुम्ही मला नमस्कार केला म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. आणि तुमच्या दोघांच्याही ओंजळीत मी आणखी एकेक दान घालणार आहे.”

” कोणतं देवा ? ” दोघेही अधीर झाले होते.

” सांगतो. पण दान मागण्याचा पहिला अधिकार स्त्रीला हे मान्य आहे का तुला.” परमेश्वर पुरुषाकडे पहात म्हणाला.

पुरुषांना लगेच आपली संमती दर्शविली. आणि परमेश्वराकडे पहात म्हणाला, ” देवाधी देवा, तुमची अट मान्य आहे मला. पण तुम्ही आमच्या ओंजळीत कोणतं दान घालणार आहे ते तरी कळू द्या.”

” हे देवी सौंदर्य आणि बुद्धी. या पैकी काय हवं तुला.” स्त्रीकडे पहात परमेश्वर म्हणाला.

एका क्षणाचाही विलंब न लावता स्त्री उत्तरली, ” मला सौंदर्य हवंय देवा.”

” तथास्तु.” म्हणत परमेश्वरानं सौन्दर्याच दान स्त्रीच्या ओंजळीत घातलं मात्र………. दाही दिशा उजळून निघाल्या. त्या मूर्तीमंत सौंदर्यानं पुरुषाचेच काय प्रत्यक्ष परमेश्वराचेही डोळे दिपून गेले. पण तरीही आधी सौंदर्य मागून स्त्रीनं खुळेपणाच केलाय असं वाटून परमेश्वर मनोमन हसत होता. बुद्धी ही सौंदर्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठच आहे याची परमेश्वराला जाणीव होती. परमेश्वरानं उरलेलं बुद्धीच दान पुरुषाच्या ओंजळीत घातलं. दोघे पुन्हा परमेश्वराच्या चरणी लीन झाले. परमेश्वरानं दोघांना पृथ्वीच्या दिशेने मार्गस्थ होण्यास सांगितले.

दोघेही चालून काही पावले पुढे गेले असतील नसतील तोच परमेश्वरानं स्त्रीला हाक मारली. स्त्री जवळ येताच परमेश्वर तिला म्हणाला, ” बाळ, एक विचारायचं आहे.”

” देवाधीदेवा विचारा ना तुम्हाला संकोच मानण्याचं काहीच कारण नाही. ” स्त्री नम्रतेने म्हणाली.

” खरंतर ' सौंदर्यापेक्षा बुद्धी श्रेष्ठ ' असं असतानाही आणि पहिली संधी तुला देलेली असतानाही तू सौन्दर्याच दान का मागितलस ?”

” सौंदर्याच्या बळावर बुद्धीला वश करता येईल देवा.” असं म्हणत पुरुषच्या मागोमाग स्त्री पृथ्वीवर आली.

आणि तेव्हापासून बुद्धी सौंदर्याची दास झाली.

No comments:

Post a Comment