Friday 29 August 2014

Indian Festival:गणेश चतुर्थी का साजरी करतात ? कथा १

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे सर्वज्ञात आहे. पण त्यापूर्वी साजरा केला जात नव्हता का ? गणेशोत्सव त्यापूर्वीही साजरा केला जात होता. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. मध्यंतरी शीला आणि मुन्नी मध्ये अडकलेला गणेशोत्सव आता अधिकाधिक लोकाभिमुख होतोय. झांज पथकांच्या तालात रमतोय. पण का आणि कधीपासून सुरु केला जातोय गणेशोत्सव ? त्या संदर्भातील काही कथा येत्या दहा दिवसात. काही पौराणिक असतील तर काही काल्पनिक अर्थात मी लिहिलेली. त्यातली हि पहिली कथा -



भारताच्या उत्तरेला काशिपुरमच्या ( आत्ताची काशी ) पलीकडे रक्तवर्णी नावाचं राज्य होतं. सिंदासुर नावाचा राक्षस तेथे राज्य करीत होता. सामान्य माणसाला तर त्याने सळो कि पळो करून सोडले होतेच पण शेजारीच हिमालयाच्या वर असलेला देवांचा स्वर्गही काबीज करण्याचा आणि सगळ्या देवांना आपले दास करण्याचा त्याचा मनसुबा होता. तो आपल्या राक्षसी सैन्यासह स्वर्गावर चाल करण्यास निघाला. आजमितीस स्वर्गात उपस्थित असलेले देव आपली कोणतीही हानी करू शकत नाहीत याचा त्याला विश्वास होता. कारण भोळ्या शंकराने त्याला तसा वर दिला होता.

सिंदासुराला स्वर्गावर चाल करून येताना देवांनी पाहिले मात्र त्यांच्या कायेतले त्राणच हरपले. देवाधिदेव आणि देवांचा राजासुद्धा भयभीत झाला होता. सारे देव भगवान विष्णूंना शरण गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी सर्व देवांना अभय दिले आणि सांगितले, " देवांनो, कोणीही भयभीत होण्याची गरज नाही. मी देवी पार्वतीच्या उदरी जन्म घेईन आणि सिंदासुराचा वध करीन."

सिंदासुराणे देवांना भयभीत झालेले पहिले मात्र तो अधिकच मदमस्त झाला. आपण स्वतः चाल करून जाण्याची त्याला गरज वाटेना. त्यामुळे त्याने त्याचा सेनापती गजासुराला मोजके सैन्य देऊन स्वर्गावर चाल करून जाण्यास सांगितले. गजासुर हा राक्षस रुपी हत्ती होता. त्याच्या अंगी सहस्त्र हत्तींचे बळ होते. मदमस्त गजासुर देवांवर तुटून पडला. पण भगवान विष्णू मदतीला येईपर्यंत देवांना लढणे भाग होते. माघार घेवून चालणार नव्हते.

गजासुर आणि देवांमधे घनघोर युद्ध सुरु होते. गजासुर त्वेषाने लढत होता. आणि भयभीत झालेले देव भगवान विष्णूंचा धावा करत होते.

देवांना वचन दिल्याप्रमाणे भगवान विष्णूंनी देवी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला. पण त्या नवजात बालकाला मस्तकच नव्हते. आणि त्यामुळेच त्यामध्ये प्राणही नव्हते. आता काय करावे असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. देवी पार्वतीला शोक अनावर झाला. तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले, " बालके चिंता करू नकोस. राक्षसांच्या विरूद्ध सुरु असलेल्या युद्धात जो पहिला बळी पडेल त्याचे मस्तक या बालकाला लावल्यास ते बालक सजीव होईल."

भगवान शंकर जवळच उभे होते. ते अधिकच चिंतीत झाले. कारण त्यांनी सिंदासुराला दिलेल्या अभयाचे त्यांना स्मरण झाले. भगवान शंकराच्या चेहऱ्यावरील चिंतेचे मळभ पाहून ब्रह्मदेव म्हणाले, " महादेवा , चिंता कसली करता आपण अभय सिंदासुराला दिले आहे गजासुराला नव्हे. "

ब्रम्हदेवांना काय सुचित करावयाचे आहे ते महादेवाला कळाले.     

भगवान शंकरांनी त्रिशूल उचलले आणि युद्धात सामील होत आघाडीवर गेले. समोर त्रिभुवनापती भगवान शंकर कधी आले हे गजासुराच्या लक्षातही आले नाही. भगवान शंकरांनी त्रिशुळाच्या एका घावत गजासुराचे मस्तक धडावेगळे केले आणि ते नेऊन नवजात अर्भकाच्या धडावर बसवले. ब्रम्हदेवांनी प्राण फुंकले मात्र ते बालाक सजीव झाले. गजासुराचे मस्तक धारण करणारे बालक म्हणून त्याचा गजानन म्हणून नामघोष करण्यात आला. देहात प्राण येताक्षणी आपण देवांना काय अभय दिले आहे याचे स्मरण बालाकरूपी भगवान विष्णूंना झाले. आणि ते युद्धात सहभागी झाले.

इकडे गजासुराचा वध झाल्याचे पाहून सिंदासुर गगनभेदी गर्जना करीत देवांवर चालून गेला. आपल्यावर यापूर्वी अस्तित्वात नसलेला देव चालून येतो आहे याचे त्यास भान उरले नाही. देवांचा पराभव करण्याच्या नादात सिंदासुराला भगवान शंकरांचे शब्दही स्मरले नाहीत. सिंदासुर गजाननाचे ते अनोखे रूप पाहून भयभीत झाला. पण तरीही त्याने आणि गजाननाशी घनघोर युद्ध केले.  गजाननाने सिंदासुराचा वध केला. देवांना आणि पृथ्वीतलावरील सजीवांना सिंदासुराच्या जाचातून मुक्त केले. तो दिवस चतुर्थीचा होता. स्वर्गात आणि पृथ्वीतलावर त्यादिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आणि त्या दिवसाची आठवण म्हणून तेव्हापासून स्वर्गात आणि पृथ्वीतलावर गणेशोत्सव साजरा होऊ लागला.



No comments:

Post a Comment